विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात यंदाचा पावसाळा अक्षरशः विक्रमी ठरला आहे. साधारणपणे जून ते सप्टेंबर हा पारंपरिक पावसाळ्याचा काळ असतो, मात्र यावर्षी पावसाची सुरुवात मे महिन्यातच झाली आणि ऑक्टोबरचा शेवट गाठूनही तो थांबण्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ५ नोव्हेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या सलग पावसामुळे राज्यातील शेतकरी वर्ग प्रचंड अडचणीत आला आहे. विशेषतः पालघर, रायगड, रत्नागिरी, कोकण, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगोला, सातारा, सोलापूर भागात पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे.
सलग पावसाचा परिणाम
गेल्या सहा महिन्यांच्या अखंड पावसामुळे धान, ऊस, भात, सोयाबीन, तूर, भुईमूग यांसारखी पिकं मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी पिकं चिखलात गाडली गेली आहेत, तर काही ठिकाणी नुकतीच काढणीस तयार असलेली पिकं पाण्याखाली गेली आहेत. परिणामी शेतकऱ्यांना हातात आलेलं उत्पन्नही वाया गेलं आहे.
शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
कृषी विभागाच्या प्राथमिक पंचनाम्यानुसार, आतापर्यंत सुमारे १४ हजार हेक्टर शेती क्षेत्र नुकसानग्रस्त झालं आहे. तर गेल्या काही महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ५० हजारांहून अधिक शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं होतं. नव्या पावसाने ही जखम अधिक खोल झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खासऱ्यातील धान्य साठे पाण्याखाली गेल्याने ते हतबल झाले आहेत.
हवामान खात्याचा इशारा
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अरबी समुद्र आणि दक्षिण महाराष्ट्र किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस सुरू राहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आणि पिकांचं संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
सरकारकडून मदतीची मागणी
शेतकरी संघटनांनी सरकारकडे तत्काळ नुकसान भरपाई आणि नवीन पंचनामे करण्याची मागणी केली आहे. तसेच साचलेल्या पाण्यामुळे पिकांवर रोगराई होऊ नये म्हणून कृषी विभागाने तत्परतेने उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी होत आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून प्रचंड पाऊस महाराष्ट्रासाठी नवा विक्रम ठरला असून, शेतकऱ्यांच्या जगण्यावर आणि उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम केला आहे. हवामान विभागाच्या नव्या इशाऱ्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा एकदा चिंतेचं आणि शेतकऱ्याचे भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
