सांगोल्यात अवैध दारू अड्ड्यावर छापा; २.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगोला/प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील भाळेवाडी येथे असलेल्या अवैध दारू अड्ड्यावर सांगोला पोलिसांनी कारवाई करत २ लाख ५८ हजार ७२० रुपयांचा दारूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दि. ३० एप्रिल रोजी सांगोला पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक दिनोदय घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोसई दिप्परकर, पो.कॉ. धुळदेव चोरमुले आणि पो.कॉ. सद्दाम नदाफ यांनी संयुक्त पथकासह ही कारवाई केली.
भाळेवाडी येथे पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी संशयित इसमाला पकडले. त्याचे नाव सदती सदादिव आदटी (वय ४३, रा. नाझरा, ता. सांगोला) असे असून त्याच्याकडून देशी व विदेशी कंपनीच्या एकूण ७७ बॉक्स दारू (किंमत ₹२,५८,७२०/-) हस्तगत करण्यात आली.
या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३४३/२०२५ नोंदवण्यात आला आहे. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(ई) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून पो.कॉ. सद्दाम नदाफ यांनी सरकारी फिर्याद दिली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रताप यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिग्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.पुढील तपास श्रेणी पोसई दिप्परकर करत आहेत.