पुणे/विशेष प्रतिनिधी : पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. एका गर्भवती महिलेच्या उपचारांसाठी १० लाख रुपयांची मागणी केल्याच्या आरोपामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या या वर्तणुकीमुळे तनिषा सुशांत भिसे या महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
पैशांअभावी उपचार नाकारले?
तनिषा भिसे यांना प्रसूतीसाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न कुटुंबीयांनी केला. मात्र, रुग्णालय प्रशासनाने १० लाख रुपयांच्या डिपॉझिटची मागणी केली. त्यावेळी कुटुंबाकडे तातडीने अडीच लाख रुपये जमा करण्याची तयारी होती, तरीही रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेतले नाही.
रुग्णालयात हलवताना मृत्यू
रुग्णालयाने वेळ न दवडता उपचार न दिल्यामुळे कुटुंबीयांनी तनिषा यांना वाकड येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये हलवले. तिथे जुळ्या मुलींचा जन्म झाला, मात्र त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने मणिपाल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्याआधीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
रुग्णालय प्रशासनावर संताप
घटनेनंतर तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांनी आणि अनेक स्थानिक नागरिकांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “पैशांअभावी एका गर्भवतीचा जीव गमवावा लागतो, ही बाब अत्यंत धक्कादायक आहे,”अशी प्रतिक्रिया शहरातील अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली.
रुग्णालयावर कारवाईची मागणी
या घटनेवर आता सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या असून रुग्णालयाच्या प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हा प्रकार वैद्यकीय क्षेत्राच्या नैतिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. सरकारी यंत्रणांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.
