पुणे : खेड तालुक्यातील चाकणजवळच्या मेडणकरवाडी परिसरात एका २७ वर्षीय महिलेवर अज्ञात व्यक्तीने बलात्कार(Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.(Pune Crime) ही महिला रात्रीच्या शिफ्टसाठी कामावर जात असताना ही घटना घडली. रात्री ११:१५ ते ११:४५ च्या दरम्यान महिला कामाच्या ठिकाणी जात असताना अंधाराचा फायदा घेत आरोपीने तिला ओढत शाळेच्या मागील बाजूस निर्जन स्थळी नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश तुकाराम भांगरे तो मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील आहे. गुन्हा केल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. पळून जाण्यापूर्वी त्याने पीडितेला याबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला एका कॉम्प्लेक्सजवळून जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला आणि तिला अडवून जबरदस्तीने ओढून नेले. महिलेने आरडाओरड करण्याचा आणि प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तिने आरोपीला चावाही घेतला, तरीही त्याने तिला जबरदस्ती केली. सुदैवाने, जवळच्या एका कामगार जोडप्याने तिचा आवाज ऐकला आणि त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
चाकण पोलिसांनी तत्पर कारवाई करत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मदतीने सहा विशेष पथके तयार केली. सीसीटीव्ही फुटेज आणि माहितीच्या आधारे पोलिसांनी काही तासांतच आरोपीला ओळखले आणि अटक केली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, विशेषतः रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करून नागरिकांना काहीसा दिलासा दिला असला तरी, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
