In Public News
मुंबई/ प्रतिनिधी : राज्यभरात बोगस डॉक्टरांची समस्या गंभीर बनली असून, ग्रामीण भागासोबतच आता शहरी भागातही हे बोगस डॉक्टर सक्रिय असल्याचे आढळले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या अहवालानुसार, भारतात ५७.३ % अॅलोपॅथी डॉक्टर बोगस असून, त्यांच्या जवळ कोणतीही प्रमाणित वैद्यकीय पदवी नाही. महाराष्ट्रातच ९००० हून अधिक बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करत आहेत, असा खुलासा सेंट्रल ब्युरो ऑफ हेल्थ इंटेलिजन्सच्या अहवालातून झाला आहे.
ठाण्यात बोगस डॉक्टरांच्या मुसक्या आवळल्या!
ठाणे पोलिसांनी अलीकडेच केलेल्या कारवाईत अनेक बोगस डॉक्टर सापडले असून, त्यापैकी काहींनी प्राथमिक शिक्षणही पूर्ण केलेले नाही.काहीजण तर पूर्वी दवाखान्यांमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते आणि तिथेच त्यांनी इंजेक्शन देणे, सलाईन लावणे आणि औषधांचे ज्ञान घेतले.नंतर त्यांनी स्वतःची वैद्यकीय केंद्रे सुरू केली आणि रुग्णांच्या जीवाशी खेळू लागले.
भिवंडीतील महिला बोगस डॉक्टरचा पर्दाफाश
भिवंडीमध्ये आरोग्य विभागाने नुकत्याच केलेल्या कारवाईत एका महिला बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. तिच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही भिवंडी, कल्याण, मुंब्रा भागात अनेक बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात परिस्थिती अधिक गंभीर!
ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांकडून इंजेक्शनपासून थेट ऑपरेशनपर्यंत धोकादायक उपचार सुरू आहेत. यामुळेच मुंब्रा येथे एका महिलेचा चुकीच्या प्रसूतीदरम्यान अयोग्य उपचारांमुळे मृत्यू झाला.
राज्य सरकारचा कठोर इशारा
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार,गेल्या दोन वर्षांत १००० हून अधिक बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने मेडिकल कौन्सिल नोंदणी बंधनकारक केली असून, बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत.
