आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मुख्याध्यापकाकडून विनयभंग; मुख्याध्यापका वर गुन्हा दाखल

जत/प्रतिनिधी : जत तालुक्यातील एका नामांकित आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडून विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित मुख्याध्यापकावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल
गुन्हा दाखल झालेल्या मुख्याध्यापकाचे वय ५०, रा. नराळ, ता. सांगोला, जि. सोलापूर असे आहे. पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन दिवसांपूर्वी मुख्याध्यापक यांनी तिला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले आणि तिच्याशी अश्लील वर्तन केले.
चौकशी समितीचा अहवाल, तत्काळ कारवाई
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता समाजकल्याण व महिला व बालविकास विभागाच्या विशेष चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली होती. दोन दिवस चाललेल्या तपासणीनंतर समितीने पोलिसांना अहवाल सादर केला. या आधारावर उमदी पोलिस ठाण्यात मुख्याध्यापका विरोधात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली.
पोलीस तपास सुरु
मुख्याध्यापकाला रात्री उशिरा अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास उमदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न
या प्रकारामुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधित शाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. समाजात या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.