पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विचारांचा वारसा जपणे काळाची गरज: प्रा.मुकूंद वलेकर
सांगोला महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांचे संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आजोजित केला

सांगोला / अविनाश बनसोडे : ज्या काळात समाजात स्त्रीला घराबाहेर पडण्यास मनाई होती, अशा काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पतीच्या निधनानंतर स्वकर्तुत्वावर राज्य कारभार उत्तमरित्या चालविला. त्यांनी देशभरातील हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. घाटाची बांधणी करून, अनेक ठिकाणी पाणवठे सुरू केले. त्यांच्या सैन्यामध्ये महिलांची स्वतंत्र तुकडी होती. उच्च नैतिकेचा आदर्श त्यांनी समाजात घातला, त्याचे शेती विषयक धोरण आदर्श होते. त्याकाळात एक ही शेतकरी आत्महत्या करत नव्हता, त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा जपणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. मुकूंद वलेकर यांनी केले .
सांगोला महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविदयालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. संतोष लोंढे यांनी केले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुणे परिचय कु.भगवती ठोकळे हिने करून दिला. सूत्रसंचलन कु. सानिया शेख, कु. कल्पना सुरवसे यानी केले. आभार मातीन खतीब याने मानले. यावेळी डॉ.अर्जुन मासाळ यांचे सह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.