पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोदींनी पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली; पाहा काय दिले उत्तर

दिल्ली/प्रतिनिधी : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहेत. सुरक्षा विषयक कॅबिनेट समिती (CCS) च्या बैठकीत सीमापार दहशतवादाचे पुरावे समोर आल्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
कठोर निर्णय :
भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. SAARC अंतर्गत व्हिसा सुविधा देखील रद्द करण्यात आली आहे. यासोबतच, भारताने सिंधू जल करारानुसार पाकिस्तानला दिला जाणारा पाणीपुरवठाही थांबवला आहे. तसेच भारताने आपले राजनयिक पाकिस्तानमधून परत बोलावले आहेत.
CCS बैठकीनंतर परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती दिली. १९६० मधील सिंधू जल करार तत्काळ प्रभावाने स्थगित केला जात आहे. जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवाद पूर्णपणे थांबवत नाही, तोपर्यंत हा करार अमलात राहणार नाही. त्यामुळे पाकिस्तानला भारतातून पाणी मिळणे पूर्णपणे थांबेल.
सरकारने अटारी इंटिग्रेटेड चेक पोस्ट तत्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तिथून आता कोणतीही ये-जा होणार नाही. ज्या व्यक्तींनी वैध कागदपत्रांसह भारतात प्रवेश केला आहे, त्यांनी १ मे २०२५ पर्यंत परत जावे लागेल, आणि त्यासाठी त्यांना हाच मार्ग वापरावा लागेल.