Railway Accident : पुष्पक एक्स्प्रेसमधून पाच प्रवासी ट्रॅकवर पडले; दुर्दैवी मृत्यू

मुंबई/प्रतिनिधी : मुंबईतील मध्य रेल्वेमार्गावर आज सकाळी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवास करत असताना पाच प्रवासी अचानक ट्रॅकवर पडले आणि या अपघातात सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना दिवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान घडली. ट्रेनमध्ये झालेल्या प्रचंड गर्दीमुळे हे प्रवासी दारात लटकले होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. सकाळी 8.25 वाजता सीएसएमटीवरून निघालेली पुष्पक एक्स्प्रेस लखनौकडे जात होती. पुढचा थांबा कल्याण असतानाच ही दुर्दैवी घटना घडली.
अपघातानंतर जखमी प्रवाशांना तातडीने अॅम्ब्युलन्सद्वारे कळव्यातील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी पाचही जणांना मृत घोषित केल्याची माहिती आहे.
कसाऱ्याकडे जाणाऱ्या एका रेल्वेच्या गार्डने ही घटना रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. सध्या हे प्रवासी नेमके कसे खाली पडले याचा तपास सुरू आहे. अद्याप या घटनेची अधिकृत आणि सविस्तर माहिती मिळालेली नाही, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी स्पष्ट केले.
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दररोजच्या प्रवासात होणाऱ्या गर्दीमुळे जीवितहानी होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.
https://www.instagram.com/reel/DKmWf1hNlRT/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==