
नवी दिल्ली / प्रतिनिधी: भारत सरकारने पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला ‘पर्सोना नॉन ग्राटा’ घोषित करत २४ तासांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. या अधिकाऱ्याने आपल्या राजनयिक दर्जाच्या मर्यादांचा भंग केल्याचा ठपका भारताने ठेवला असून, या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पाकिस्तानी अधिकारी भारतात असताना आपली वागणूक व कार्यशैली राजनयिक शिष्टाचाराच्या विरोधात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याला अवांछित व्यक्ती (Persona Non Grata) ठरवून २४ तासांच्या आत भारतातून बाहेर जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हे पाऊल अशा वेळी उचलण्यात आले आहे, जेव्हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंध आधीच तणावपूर्ण आहेत. याआधीही, भारताने पाकिस्तानविरोधात कडक धोरण राबवत नवी दिल्लीतील पाकिस्तानी मिशनमधील कर्मचार्यांची संख्या ५५ वरून ३० पर्यंत घटवली होती.
ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाई
सदर निर्णय ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर घेण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात, भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीनसारख्या दहशतवादी गटांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले होते. या हवाई कारवाईत किमान १०० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा अंदाज आहे.
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यात पाकिस्तान-समर्थित दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांचा निर्घृण खून केला होता. त्यानंतरच्या २४ तासांत भारताने या घटनेचा तीव्र निषेध करत राजनैतिक पातळीवर पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली.
भारताने केवळ पाकिस्तानी अधिकाऱ्यांची संख्या कमी केली नाही, तर सर्व पाकिस्तानी संरक्षण सल्लागारांना देशाबाहेर हाकलले, तसेच इस्लामाबादमधून आपल्या संरक्षण सल्लागारांना परत बोलावले आणि तिथे कार्यरत राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्याही कमी केली आहे.