पहलगाम हल्ला: दहशतवादी कोण होते, त्यांनी प्रशिक्षण कुठे घेतले आणि हल्ला कसा केला?

पहलगाम /प्रतिनिधी: पहलगाममधील बैसरन पर्यटनस्थळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हल्लेखोर कोण होते, त्यांचे संबंध कोणत्या संघटनांशी होते, आणि त्यांनी सीमा ओलांडून हल्ला कसा केला, याचा सखोल तपास सुरू आहे.
रेखाचित्रे आणि ओळख पटवण्याचा प्रयत्न
तपास यंत्रणांनी जारी केलेली दहशतवाद्यांची रेखाचित्रे अलीकडे पाकिस्तानातून घुसखोरी करून आलेल्यांच्या रेखाचित्रांशी जुळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने बनवलेल्या या रेखाचित्रांवरून तीन दहशतवाद्यांची ओळख पटली आहे – आसिफ फौजी (शोपियान), सुलेमान शाह आणि अबू तल्हा (पाकिस्तानातील लष्कर कमांडर).
टीआरएफची जबाबदारी, पण सूत्रधार पाकिस्तान?
हल्ल्यानंतर लगेचच लष्कर-ए-तैयबाच्या प्रॉक्सी संघटनेने, द रेझिस्टन्स फोर्स (TRF) ने जबाबदारी स्वीकारली. गुप्तचर यंत्रणांनुसार, या हल्ल्याचा कट फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानच्या रावलकोट (पीओके) मध्ये रचला गेला होता. या वेळी लष्कर व जैश-ए-मोहम्मदने ‘काश्मीर एकता दिन’ साजरा करताना हमासच्या नेत्यांनाही आमंत्रित केल्याचे निष्पन्न झाले आहे.
‘हमास’ कनेक्शन आणि पाक लष्कराचा सहभाग ?
७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हमासने ‘अल-अक्सा फ्लड’ ऑपरेशनद्वारे हल्ला केला होता. त्याच धर्तीवर, रावलकोटमध्ये पाक लष्कर, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदने हमासप्रेरित रॅली काढली होती. जैशच्या मुख्यालयात हमास कमांडर्सचे स्वागत झाल्याने या संबंधांवर शिक्कामोर्तब झाले. भारतीय गुप्तचर संस्थांना संशय आहे की, पाक लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या प्रेरणेतून हा कट रचण्यात आला.
सीमा ओलांडून आले, अपारंपरिक मार्गाचा वापर
दहशतवादी काही महिन्यांपूर्वी नियंत्रण रेषा ओलांडून पीर पंजाल रांगेतून डोडा, किश्तवार आणि वाधवन खोऱ्यातून पहलगाममध्ये पोहोचले. पारंपरिक मार्ग टाळून त्यांनी धोकादायक आणि अपारंपरिक मार्गाचा अवलंब केला. त्यामुळे पाकिस्तानच्या SSG (Special Services Group) कडून प्रशिक्षण मिळाल्याचा संशय अधिक दृढ झाला आहे.
स्थानिक साथ? आदिल गुरीचा सहभाग?
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आदिल गुरी या जुन्या दहशतवाद्याचे नावही समोर येत आहे. २०१८ मध्ये अटारी-वाघा मार्गे पाकिस्तानला गेलेला आदिल अलिकडेच परत आला असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे त्याच्याद्वारे स्थानिक मदतीची शक्यताही तपासली जात आहे. पहलगाममधील भीषण हल्ला हा केवळ TRF किंवा लष्करचा नव्हे, तर पाकिस्तानी गुप्तचर संस्था, कट्टर इस्लामी गट, आणि स्थानिक सहाय्य यांचा संयुक्त कट असल्याची शक्यता तपास यंत्रणांना वाटते आहे.