मुंबई प्रतिनिधी: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून, त्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात तीव्र भावना व्यक्त होत आहेत.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे महाराष्ट्रभर ‘पाकव्याप्त काश्मीर (PoK) ताब्यात घ्या’ अशी जोरदार मागणी करत स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विविध रेल्वे स्थानकांवर, बाजारपेठांमध्ये आणि मुख्य चौकांत मोठे फलक उभारून स्वाक्षरी अभियान राबवलं आहे. “पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग व्हायलाच हवा” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला आहे. नागरिकांनीही या मोहिमेला भरभरून प्रतिसाद दिला आहे.
‘बदला घ्यायची वेळ आलीय!’ – आदित्य ठाकरे
या मोहिमेला पाठिंबा देताना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्स (माजी ट्विटर) वर लिहिलं, “देशावर ओढवलेल्या दुःखद प्रसंगात आम्ही भारत सरकारसोबत ठाम उभे आहोत. जो काही कठोर निर्णय घेतला जाईल, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आता बदला घ्यायची वेळ आलीय! पाकधार्जिण्या अतिरेक्यांचा कणा मोडलाच पाहिजे!”
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारनेही कडक पावलं उचलली आहेत. पाकिस्तानवर विविध निर्बंध लादले जात आहेत. तसेच, भारतातील सर्व पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात ठिकठिकाणी बंद पाळण्यात येत असून निषेध मोर्चे आणि आंदोलनं सुरू आहेत. ठाकरे गटाची ही स्वाक्षरी मोहीम देखील जनतेच्या मनातील भावना व्यक्त करणारी ठरली आहे.
