“अरे जाऊ दे यार..” : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर एकनाथ शिंदे भडकले

मुंबई/प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा “ठाकरे विरुद्ध ठाकरे” हे समीकरण चर्चेत आहे – मात्र यावेळी वेगळ्या कारणामुळे. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघं एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राज ठाकरे यांनी अलीकडील एका मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्यासमोर टाळीसाठी हात पुढे केला आणि उद्धव ठाकरेंनीही हसत प्रतिसाद दिला. या साध्या इशाऱ्यानेही अनेक शक्यता, चर्चांचा धूर निर्माण केला आहे.
एकनाथ शिंदेंचा संताप: “काय रे, कामाचं बोल!”
या चर्चांवर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र नाराज दिसले. सातारजवळील त्यांच्या गावी दौऱ्यावर असताना पत्रकाराने ठाकरे बंधूंविषयी प्रश्न विचारताच शिंदे भडकले.
“अरे जाऊ दे यार… काय रे, कामाचं बोल!” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यांच्या या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
फडणवीसांचं मवाळ उत्तर: “एकत्र येणं स्वागतार्ह”
याउलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घडामोडींवर संयमित प्रतिक्रिया दिली.
“कोणी मतभेद विसरून एकत्र येत असेल, तर त्यात वावगे काही नाही. माध्यमांमध्ये जशी चर्चा सुरू आहे, तशीच आम्हीही वाट पाहतो आहोत. जर दोघं एकत्र आले, तर स्वागतच आहे,” असं फडणवीस म्हणाले.
त्यांनी आणखी स्पष्ट केलं की, “ऑफर देणारे एक आणि प्रतिसाद देणारे दुसरे आहेत. त्यामुळे मी फार बोलणार नाही.”राजकीय संकेत, संभाव्य आघाड्या आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या हलक्या अशा परंतु मोठा राजकीय अर्थ असणाऱ्या कृतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.