Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारत-पाकिस्तान सीमेलगत एक मोठी घडामोड समोर आली आहे. पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील जेठुवाल गावाजवळ पाकिस्तानकडून डागलेलं एक रॉकेट आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ पाडण्यात आलं आहे. भारतीय लष्कराने तत्काळ या रॉकेटचे अवशेष ताब्यात घेतले असून संपूर्ण परिसरात सतर्कता वाढवण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, गेल्या रात्री भारतीय लष्कराने ही कारवाई करत सीमेवरून येणारा धोका तात्काळ निष्प्रभ केला.
दरम्यान, भारतीय वायुदलाला केंद्र सरकारकडून खुले आदेश देण्यात आले आहेत की, पाकिस्तानी विमानं हवाई हद्दीत शिरली, तर त्यांना प्रत्युत्तर देण्यास मोकळं ठेवावं. त्यामुळे आकाशातही तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
याच दरम्यान, पाकिस्तानच्या आतील अस्थैर्यही समोर आलं आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या बोलन दर्रा भागात मोठा स्फोट घडवून आणला. या हल्ल्यात पाकिस्तानचे किमान १२ सैनिक ठार झाले आहेत. या स्फोटाची जबाबदारी खुद्द बलुच लिबरेशन आर्मीने स्वीकारली असून, त्यांच्या स्पेशल टॅक्टिकल युनिटनं ही कारवाई केली.
तसेच, पाकिस्तानातील एका दहशतवादी तळावर सरकारच्या एका अधिकृत कार्यालयाचा थेट वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पाकिस्तान आणि दहशतवाद यांचं नातं किती गहिरं आहे, हे पुन्हा अधोरेखित झालं आहे. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाकिस्तानच्या झोप उडवली असून, सीमा सुरक्षेसाठी भारत कोणतीही तडजोड करणार नाही हे स्पष्ट केलं आहे.
