
दिल्ली / प्रतिनिधी: देशाच्या सुरक्षेसाठी आणि सीमावर्ती भागातील दहशतवादी कारवायांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय लष्कराची ताकद वाढवण्यासाठी मोदी सरकारकडून संरक्षण विभागासाठी अतिरिक्त ५०,००० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात या निधीला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दहशतवादाचा पूर्ण बिमोड करण्यासाठी भारताने सुरू केलेलं ऑपरेशन ‘सिंदूर’ अजूनही चालू असून, लष्कराने याअंतर्गत पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील प्रदेशात ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती मिळाली आहे. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर संरक्षण खात्याचं सध्याचं बजेट ६.८१ लाख कोटी रुपये असून, २०१४ पासून मोदी सरकारच्या कार्यकाळात हे सर्वाधिक बजेट ठरलं आहे. २०१४-१५ मध्ये हे बजेट २.२९ लाख कोटी इतकं होतं.
या निधीतून शस्त्र खरेदी, अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, दारुगोळा आणि जवानांच्या सुविधांसाठी विविध योजनांवर भर दिला जाणार आहे.
दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी तालिबान सरकारमधील मंत्री आमिर खान मुत्तकी यांच्याशी संवाद साधला असून, भारत-अफगाणिस्तान संबंध पुन्हा दृढ होण्याचे संकेत दिले आहेत. पाकिस्तानकडून अफवा पसरवण्याचे प्रयत्न अफगाणिस्तानने हाणून पाडल्याबद्दल जयशंकर यांनी आभारही मानले आहेत.