छत्तीसगड / प्रतिनिधी: कौटुंबिक कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या कुटुंबावर काळाने झडप घातली. दोन वाहनांच्या भीषण टक्करात एकाच कुटुंबातील १३ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा महिन्याच्या बाळाचा, नऊ महिला व तीन बालकांचा समावेश आहे. ही घटना रायपूरजवळील खरोरा हद्दीतील सारागावजवळ रात्री घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बन्सरी गावात कौटुंबिक कार्यक्रम आटोपून चतौड गावातील कुटुंब ट्रकमधून परतत असताना त्यांच्या वाहनाला मागून येणाऱ्या ट्रेलरने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की ट्रकमधील अनेक जण जागीच ठार झाले.
घटनेनंतर परिसरात एकच हाहाकार माजला. काही जण ट्रकमध्ये अडकून पडले होते, त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. पोलीस आणि आपत्कालीन सेवांची पथके तत्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी मृतदेहांचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाकडून मृतांच्या कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे.
