राज्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रासाठी ‘डॅशबोर्ड’चा नवा अध्याय!

खासगी व सार्वजनिक विद्यापीठांचा समावेश; शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई/प्रतिनिधी: राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांची अद्ययावत माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने विकसित केलेल्या ‘डॅशबोर्ड’चे उद्घाटन गुरुवारी मंत्रालयात शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.
या डिजिटल डॅशबोर्डमध्ये प्रवेश प्रक्रिया, निकाल, शिष्यवृत्ती, वसतिगृहे, शुल्क, संलग्नता प्रक्रिया, शैक्षणिक सुविधा तसेच सार्वजनिक ग्रंथालयांची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. सध्या या डॅशबोर्डवर राज्यातील २६ सार्वजनिक विद्यापीठे आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची माहिती उपलब्ध असून, लवकरच सर्व खासगी विद्यापीठांचाही समावेश केला जाणार आहे.
सर्वसामान्यांसाठी खुला डेटा
हा डॅशबोर्ड केवळ शासकीय अधिकाऱ्यांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी व पालकांसाठीही खुला आहे. त्यामुळे शैक्षणिक निर्णय घेताना खात्रीशीर आणि अद्ययावत माहिती मिळणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
“या डॅशबोर्डवर उपलब्ध माहितीचे विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने करण्यात येईल, जे शैक्षणिक धोरणनिर्मिती आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उपयुक्त ठरेल,” अशी माहिती पाटील यांनी दिली. या कार्यक्रमास उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव प्रताप लुबाळ, अशोक मांडे, संतोष खोरगडे उपस्थित होते. तर राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आणि उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.