
सातारा/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संबंधांमध्ये तणाव जाणवत नाही.परंतु एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे याच्यात सतत धूसपूर सुरु असल्याचे चित्र नेहमीच दिसते. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अनेक प्रसंगी दोघही वेगवेगळ्या कारणांमुळे एकत्र येताना दिसतात. नुसतेच अजित पवार यांच्या सुपुत्राचा साखरपुडा पार पडला, त्यावेळी शरद पवार यांनी उपस्थित राहून कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ असल्याचे संकेत दिले.
दरम्यान, आज शनिवारी (दि.१३) शरद पवार सातारा दौऱ्यावर होते, तर अजित पवार रायगड दौरा संपवून साताऱ्यात दाखल झाले. रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत पुन्हा दोन्ही नेते एकाच मंचावर आले.
या बैठकीदरम्यान संस्थेच्या गेल्या वर्षीच्या उत्पन्नाविषयी चर्चा सुरू होती. अजित पवार यांच्याकडे आवश्यक कागदपत्रं होती, मात्र नेमका तपशील शोधण्यात त्यांना अडचण आली. त्यावेळी बाजूला बसलेले शरद पवार यांनी कागदपत्रांवरील तपशील दाखवून दिला. त्यांनी संबंधित मजकूरावर बोट ठेवून वाचायला सांगितलं आणि त्यानंतर अजित पवार यांनी आकडे वाचून दाखवले.
राजकारण कितीही वेगळं असलं, तरी वैयक्तिक नातेसंबंध आणि संस्थात्मक जबाबदाऱ्या यामुळे पवार कुटुंबातील नेतेमंडळी एकत्र येताना दिसत आहेत, हेच या प्रसंगातून समोर येते.