
सोलापूर/श्रीराम देवकते : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सरचिटणीस ओंकार हजारे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर सोलापुरात घडली आहे. त्यांचा मृतदेह त्यांच्याच गाडीत आढळून आला. या घटनेने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नेमके काय घडले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार हजारे यांचा मृतदेह सुपर मार्केटजवळ थांबलेल्या त्यांच्या गाडीत आढळला. कुटुंबीय आणि मित्रांनी बराच शोध घेतल्यानंतर ते गाडीत दिसले. आवाज देऊनही त्यांनी गाडीचा दरवाजा उघडला नाही. शेवटी गाडीचा दरवाजा तोडण्यात आला. त्यांना तातडीने छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली असून, फौजदार चावडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
ओंकार हजारे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. त्यांनी संघटनात्मक कामावर विशेष भर दिला होता आणि पक्षासाठी तरुणांचे संघटन केले होते. तरुणांमध्ये ते ‘अण्णा’ या नावाने परिचित होते. त्यांच्या या अकाली निधनाने पक्षासह सोलापूरच्या राजकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. एक उगवता राजकीय पदाधिकारी गमावल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही शोककळा पसरली आहे.
ओंकार हजारे यांचा विवाह २०१९ मध्ये झाला होता. त्यांच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी, भाऊ आणि भावजय असा परिवार आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते कौटुंबिक कारणांमुळे निराशेत होते, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.