सोलापूर : विजयादशमीच्या औचित्याने शहर नवरात्र सांगता मिरवणुकीने उत्साहात न्हाऊन निघाले. “आई राजा उदो उदो… सदानंदीचा उदो उदो…” अशा गगनभेदी घोषणांनी वातावरण भारावून गेले. लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात काढली.

डीजेविरहित पारंपारिक वाद्यांच्या गजरात हा उत्सव पार पडणे हे यंदाच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले. डीजेमुक्त सोलापूर कृती समिती, ज्येष्ठ नागरिक डॉक्टर असोसिएशन तसेच शालेय विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनानंतर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे ढोल-ताशा, झांजपथक व लेझीमचाच गजर ऐकू आला.
संपूर्ण शहर शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात नवरात्र उत्सव पार पडावा यासाठी प्रशासनाने बंदोबस्ताची मोठी तयारी केली होती. 2000 पोलिसांचा ताफा, 47 फिक्स पॉईंट, नऊ मंदिर परिसरांत विशेष बंदोबस्त तसेच मुख्य तीन ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. वाहतूक शाखेतील पोलीसही या व्यवस्थेत सहभागी झाले होते.
