
सांगोला/ स्वप्नील ससाणे : राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होत असतो. विद्यार्थ्याचा फक्त बौध्दिक विकासच होणे अपेक्षित नसून, त्यांचा सर्वागीण विकास खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातूनच होत असतो असे प्रतिपादन डॉ. विजय इंगवले यांनी केले. औचित्य होते राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, सांगोला महाविद्यालय सांगोला व ग्रामपंचायत मेडशिंगी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे मेडशिंगी या गावी 25 ते 31 जानेवारी 2025 दरम्यान संपन्न होत आहे. या श्रमसंस्कार शिबिराच्या उदघाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ.विजय इंगवले हे होते. आपल्या मनोगतामध्ये त्यांनी प्रतिपादन केले की, विद्यार्थ्यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली पाहिजे. जो श्रम करतो तोच जीवनात यशस्वी होतो.
आज आपण पाहतो की, लोकांना परिश्रम न करता यश हवे असते परंतु तसे कधी होत नाही. श्रम संस्कार शिबिराचा हेतूच हा आहे की, आपल्यावर या किशोरवयात श्रमाचे संस्कार व्हावेत जेणेकरून आपण भविष्यामध्ये या श्रमाच्या माध्यमातून मोठे होणार आहोत. विद्यार्थ्यानी आजच्या स्पर्धेच्या युगात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करावी. जीवन खूप सुंदर आहे आपण हे सुंदर जीवन आपल्या कष्टाच्या माध्यमातून फुलवले पाहिजे.
गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. उमा प्रतापसिंह इंगवले यांनी सर्वप्रथम मेडशिंगी या गावात विद्यार्थ्यांचे स्वागत करून असे अवाहन केले की, आपण आमच्या गावात आला आहात आपण भरीव काम या शिबिराच्या निमित्ताने करावे.
सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ, सांगोला चे उपाध्यक्ष मा. प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी आपला अधिकाधिक वेळ आपलं भविष्य घडवण्यामध्ये खर्च केला पाहिजे. श्रमाला कमी न लेखता त्याची पूजा केली पाहिजे. आज आपण केलेल्या श्रमातूनच उद्या आपले भविष्य उभे राहणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नेांद घ्यावी.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी विद्यार्थ्यांनी आवाहन केले की, त्यांनी या सात दिवसांमध्ये गावामध्ये भरभरून काम करावे जेणेकरून गावातील लोक तुम्हाला आठवणीत ठेवतील. विद्यार्थ्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून आपली छाप गावातील लोकांवर सोडावी असेही प्रतिपादन त्यांनी केले.
उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे, अध्यक्ष मा. बाबुरावजी गायकवाड यांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना असे प्रतिपादन केले की, विद्यार्थ्यांनी व विदयार्थीनींनी या गावातील लोकांशी एकरूप व्हावे. त्यांचे दुख:, समस्या समजून घ्याव्यात व त्या सोडवण्याचा आपल्यापरीने प्रयत्न करावा. याप्रसंगी सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा. तात्यासाहेब केदार, सचिव मा. उदय(बापू ) घोंगडे, मेडशिंगी गावचे उपसरपंच मा. बाळासाहेब लेंडवे, प्रतापसिंह इंगवले, अमर गोडसे, अमीत नष्टे, प्रभाकर कांबळे, तुकाराम शिंदे, अरुण शेंडे, श्रीमती कल्पनाताई शिंगाडे व ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या शिबिराचे संयोजन कार्यक्रम अधिकारी डॉ. नवनाथ शिंदे व डॉ.सदाशिव देवकर, डॉ.सौ.विद्या जाधव, प्रा.सौ.सोनल भुंजे, डॉ. तानाजी यादव, प्रा.रोहित पवार आणि प्रशासकीय सेवक महादेव काशीद हे करीत आहेत. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. नवनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय व स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रसाद लोखंडे यांनी तर आभार डॉ सदाशिव देवकर यांनी मानले.