नागपूर : राज्यातील पोलिस पाटील यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नागपूर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भेट देत जाहीर पाठिंबा दिला. आंदोलनस्थळी पोहोचून त्यांनी पोलिस पाटील यांची व्यथा ऐकून घेतली आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत ठोसपणे आवाज उठवण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आमदार देशमुख म्हणाले की, “पोलिस पाटील अधिनियम 1967 मध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करून हा कायदा काटेकोरपणे राबवला पाहिजे. तात्पुरत्या स्वरूपातील नूतनीकरणाची पद्धत बंद करून पोलिस पाटील यांना स्थैर्य मिळाले पाहिजे।”
तसेच त्यांनी पुढील महत्त्वाच्या मागण्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी केली:
- पोलिस पाटीलची वयोमर्यादा 60 वरून 65 वर्षांपर्यंत वाढवावी
- सन 2019 पासून त्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्ती लागू करावी
- सेवानिवृत्तीनंतर 20 लाख रुपयांची एकरकमी रक्कम द्यावी
- पोलिस पाटीलांसाठी कल्याण निधी स्थापन करावा
- गृह व महसूल विभागातील भरती प्रक्रियेत 10 वर्षे सेवा पूर्ण असलेल्या पोलिस पाटीलांना समांतर आरक्षण मिळावे
- अतिरिक्त गावांचा कारभार सांभाळणाऱ्यांना 25% अधिक मानधन द्यावे
- मानधन व प्रवासभत्ता दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत मिळणे बंधनकारक करावे
- पोलिस पाटीलांना विमा संरक्षण कवच देण्यात यावे
आमदार देशमुख यांनी शासनाला म्हटले, “पोलिस पाटील ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्थेचा कणा आहेत. त्यांच्या मागण्यांना तातडीने मान्यता मिळाली पाहिजे. शासनाने हा प्रश्न त्वरित निकाली काढून पोलिस पाटील संघटनेला न्याय दिलाच पाहिजे.”
