मुंबई / प्रतिनिधी: गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता गती मिळण्याची शक्यता आहे. मुंबईसह राज्यातील इतर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांबाबतचा निर्णय येत्या ६ मे २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रशासकीय यंत्रणा सज्ज, BLO नेमणुका सुरू
निवडणूक आयोगाने निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली असून, मतदार याद्यांचे अद्ययावतकरण वेगाने सुरू आहे. नुकतेच २ मे रोजी काही सरकारी कर्मचाऱ्यांची बूथ लेव्हल ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आली. प्रत्येक BLO कडे दोन मतदान केंद्रांची जबाबदारी असते आणि त्यांचे मुख्य काम मतदारांची नावे समाविष्ट करणे, वगळणे आणि यादी अद्ययावत ठेवणे हे असते. ही नेमणूक निवडणुकीच्या पूर्वतयारीची पहिली पायरी मानली जाते.
मुंबई महापालिका निवडणुका रखडल्या कशामुळे?
मुंबई महानगरपालिका आणि इतर महापालिकांच्या निवडणुका २०२२ पासून रखडल्या आहेत. यामागे कोरोना महामारी, प्रभाग रचना, ओबीसी आरक्षण आणि कायदेशीर अडथळे ही प्रमुख कारणे होती. सध्या या सर्व महापालिकांमध्ये प्रशासकांमार्फत कारभार चालवला जात आहे, ज्यामुळे स्थानिक विकासकामांवर मोठा परिणाम झाला आहे.
६ मे रोजी काय होणार?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित अनेक याचिका सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. २०२२ मध्ये युती सरकारने केलेल्या प्रभाग रचना आणि सदस्य संख्येतील बदलांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर २२ जानेवारीला सुनावणी झाली होती. आता या याचिकांवर पुढील सुनावणी ६ मे २०२५ रोजी होणार आहे. या सुनावणीत निवडणुकीच्या तारखांबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून, राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हं आहेत.
