IND vs ENG: अभिषेक शर्माच्या तडाख्यात इंग्लंड पराभूत, टीम इंडियाचा 150 धावांनी दणदणीत विजय
सामन्याचा नायक ठरला युवा सलामीवीर अभिषेक शर्मा, ज्याची 135 धावांची आक्रमक खेळी

सांगोला/ स्वप्नील सासणे : भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी20 मालिका ज्या अंदाजात सुरू झाली, त्याचपेक्षा अधिक शानदार शेवटाने संपली. आधीच मालिका जिंकलेल्या टीम इंडियाने पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात इंग्लंडवर 150 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्याचा नायक ठरला युवा सलामीवीर अभिषेक शर्मा, ज्याने 135 धावांची आक्रमक खेळी करत भारताला 247 धावांचा डोंगर उभारून दिला. प्रत्युत्तरात इंग्लंडची संपूर्ण टीम अवघ्या 97 धावांत गारद झाली.
अभिषेक शर्माचा तुफानी खेळ
वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने टॉस गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात संजू सॅमसनने 16 धावा काढल्या, मात्र दुसऱ्या षटकात त्याचा विकेट गमावला. त्यानंतर अभिषेक शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला.
जोफ्रा आर्चर आणि जेमी ओव्हरटन यांना लक्ष्य करत, अभिषेकने अवघ्या 17 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले, जे टी20 फॉरमॅटमध्ये भारतासाठी दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक ठरले. पॉवरप्लेमध्येच टीम इंडियाने 95 धावा फटकावल्या होत्या. अभिषेकचा आक्रमक खेळ सुरूच राहिला आणि फक्त 37 चेंडूंमध्ये त्याने शतक झळकावले, जे भारतासाठी टी20मध्ये रोहित शर्मानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान शतक ठरले.
भारताच्या भक्कम फलंदाजीपुढे इंग्लंडचा सपशेल नाईलाज
अभिषेक शर्माने 54 चेंडूंमध्ये 135 धावा करत 13 षटकार आणि 7 चौकार मारले. त्याला शिवम दुबे आणि तिलक वर्मानेही चांगली साथ दिली. इंग्लंडकडून ब्रायडन कार्सने 3 बळी घेतले, मात्र भारतीय फलंदाजांना रोखू शकला नाही.
247 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लिश फलंदाज सपशेल गारद झाले आणि संपूर्ण संघ फक्त 97 धावांत ऑलआउट झाला. गोलंदाजीतही अभिषेक शर्माने योगदान देत 2 गडी बाद केले.
टीम इंडियाचा मालिकाविजय
या विजयासह टीम इंडियाने मालिका 4-1 ने आपल्या नावावर केली. या मालिकेत युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी करत भारतासाठी टी20 विश्वचषकापूर्वी आत्मविश्वास वाढवणारा विजय मिळवला.