विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षेत डॉ. हिमालय बाळकृष्ण घोरपडे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळवून माळशिरस आणि सांगोला तालुक्याचा मान उंचावला आहे. सध्या ते अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसन तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. हिमालय घोरपडे हे मळोली (ता. माळशिरस) येथील रहिवासी असून सध्या सांगोला येथे वास्तव्यास आहेत. ते अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. बाळकृष्ण घोरपडे आणि सांगोला येथील वामनराव शिंदे विद्यालयाच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सुवर्णप्रभा घोरपडे यांचे चिरंजीव आहेत.
त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगोला येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण कोल्हापूर येथील विवेकानंद सायन्स कॉलेजमध्ये घेतले तर वैद्यकीय पदवी (एमबीबीएस) मुंबईतील नायर हॉस्पिटल सेंटर येथे पूर्ण केली.
सन २०१९ मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवून तहसीलदार पद प्राप्त केले. यशदा, पुणे येथे प्रशिक्षणानंतर त्यांनी हिंगोली येथे पर्यवेक्षाधीन तहसीलदार म्हणून काम पाहिले. नंतर २०२२ ते २०२४ या कालावधीत त्यांनी अप्पर तहसीलदार म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली. सध्या ते पुनर्वसन तहसीलदार म्हणून कार्यरत असून, आपल्या कर्तृत्वाने प्रशासनात नवा आदर्श निर्माण केला आहे.
डॉ. हिमालय घोरपडे यांच्या या उत्तुंग यशामुळे सांगोला व माळशिरस तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षक, सहकारी अधिकारी, तसेच ग्रामस्थांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
