आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा इन पब्लिक न्यूजशी बोलताना मोठा खुलासा…
सांगोला : सांगोला तालुक्याच्या इतिहासात 10 ऑक्टोबर 2025 हा दिवस काळ्या अक्षरांनी लिहिला जाईल. कारण, या दिवशी स्व. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या घरावर अज्ञात व्यक्तीने दारूची बाटली फेकून भ्याड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकाराने तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला आहे. ते म्हणाले, हा हल्ला स्व.डॉ. गणपतराव देशमुख यांच्या घरावर नाही, तर लोकांच्या मनावर झाला आहे. आबासाहेब हे सांगोल्याचे आत्मा होते. त्यांच्या स्मृतीवर आणि विचारांवर हल्ला करणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही.
दरम्यान, सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी इन पब्लिक न्यूजशी बोलताना त्यांनी या घटनेचा जाहीर निषेध केला. ते म्हणाले, हा भ्याड हल्ला अत्यंत निंदनीय आहे. 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता घरासमोर सर्व शेकाप कार्यकर्ते एकत्र येऊन शांततेत आणि कायद्याचे पालन करत निषेध व्यक्त करणार आहेत. तसेच सांगोला बंदचे ही त्यांनी आवाहन केले.
ते पुढे म्हणाले, “ज्याने हा भ्याड प्रकार केला आहे, त्याला समज देऊन सोडून द्यावे. प्रशासनाने त्याचे नाव उघड करू नये, कारण हे आबासाहेबांच्या विचारांवर झालेलं कलंकित कृत्य आहे असे ते म्हणाले.
शेकापच्या ज्येष्ठ नेत्यांनी कडक शब्दांत इशारा देत म्हटले,
दारूच्या बाटल्या टाकून घरावर हल्ला करणे, ही तुमची लायकी दाखवते! आम्ही या कृत्याला लवकरच चोख प्रत्युत्तर देऊ, पण संयम आणि कायद्याचा मार्ग सोडणार नाही.
या घटनेनंतर सांगोला परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. शेकाप कार्यकर्त्यांकडून आबासाहेबांच्या विचारांचा सन्मान राखत शांततेने निषेध करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेने सांगोला राजकीयदृष्ट्या पुन्हा एकदा हादरला आहे.
