
सांगोला/ प्रतिनिधी: शेतकऱ्याकडून काही निरोपयोगी भाकड जनावरे बाजारामध्ये विक्रीसाठी आणली जातात. सरकारच्या गोमाता बचाव, गोवंश बचाव या कायद्याखाली गोरक्षक व बजरंगदल शेतकरी व व्यापारी वर्गावर मोठ्या प्रमाणात अन्याय करीत आहेत. भाकड जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरत आहे.
ही गोवंशाची जनावरे बाजारात विक्रीसाठी आणली असता गोरक्षकाकडून बळजबरीने ताब्यात घेतली जातात. बजरंग दलाचे कार्यकर्ते व गोरक्षक ही जनावरे कुठे नेतात हे अस्पष्ट आहे. गाईंची नर जातीची वासरे शेतकऱ्यांना सांभाळणे अवघड होते. अशावेळी विकावी लागतात. गोवंश जनावरे गोशाळेत पाठवून त्याचे पालन पोषण करण्याच्या नावाखाली अन्याय अत्याचार वाढत आहेत. सरकारने हा कायदा रद्द करावा व्यापारी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी भूमिका बहुजन समाजाच्या वतीने, शेतकरी व व्यापारी यांच्या रक्षणासाठी घेण्यात आली आहे.गोरक्षणाच्या नावाखाली अनेक जण कायदा सुव्यवस्था हातामध्ये घेत आहेत .गोरक्षकांनी हुकूमशाही करू नये. यासाठी येत्या गुरुवारी 21 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयावर सरकारच्या अन्यायकारक कायद्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी सांगोला येथे आयोजित केलेल्या बैठकीमध्ये दिली.
शेतकरी संघटनेचे राज्य सरचिटणीस बाळासाहेब वाळके यावेळी म्हणाले, सरकारने गोवंशहत्या बंदी कायदा लागू केला असून तो अन्यायकारक आहे. शेतकऱ्यांच्या भाकड जनावरांच्या खरेदी विक्रीवर बंदी ,वाहतुकीवर बंदी घातली. गोवंशहत्या बंदी म्हणजेच गोपालक हत्या असे म्हटले तरी वावगे होणार नाही. केंद्र व राज्य सरकारने बजरंग दल व गोरक्षक यांना प्रोत्साहन व गोवंशहत्या बंदी कायदा रद्द करावा. प्रत्येक गावात जनजागृती करावी व 21 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, व्यापारी बांधव यांनी सहभागी व्हावे व सरकारला कायदा रद्द करण्यास भाग पाडावे. असा निर्णय घेण्यात आला .
यावेळी रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले म्हणाले, गोहत्याबंदी कायदा शेतकऱ्यांसाठी व व्यापारासाठी अन्यायकारक आहे. गोरक्षक व बजरंग दल कार्यकर्ते शेतकरी व व्यापाऱ्यावर अन्याय करीत आहेत. या संदर्भात सरकारकडे दाद मागण्यासाठी सर्वांनी संघटित झाले पाहिजे. शेतकऱ्यांची भाकडे जनावरे सरकारने गोशाळा काढून स्वतः सांभाळावी अन्यथा जनावर सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. गोवंशहत्याबंदी कायदा शासनाने रद्द करावा. अन्यथा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सरकारने गोशाळा काढून शेतकऱ्यांची भाकड जनावरे योग्य किंमतीला विकत घेऊन सांभाळावी आठ दिवसात गोवंशहत्या बंदी कायदा रद्द करावा. शेतकरी व व्यापारी वर्गावर होणारा अन्याय थांबवावा. अन्यथा 21 ऑगस्ट रोजी राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तहसील कार्यालय भव्य मोर्चा काढू. सध्या शेतकरी,खाटीक व कुरेशी, व्यापारी बांधव यांच्यावरती मोठ्या प्रमाणावर
अन्याय केला जात आहे. गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करावा. हा निर्णय सरकारने मागे घ्यावा अन्यथा राज्यभर आंदोलन उभारू .असा इशारा बहुजन समाजाने दिला आहे.
यावेळी सिताराम बनसोडे इरफान फारुकी प्राध्यापक हनुमंत कोळवले यांनी मनोगत व्यक्त केले. बौद्ध विहार सांगोला येथे देण्यात आलेल्या बैठकीसाठी युवा नेते अमोल खरात शेतकरी संघटनेचे शंभू माने भारत चव्हाण नितेश बनसोडे प*** खाटीक, कुरेशी व खाटीक बांधव व व्यापारीवर्ग उपस्थित होते.