सांगोला /प्रतिनिधी: खिलारवाडी (ता. सांगोला) येथील शिंदे वस्तीवर मंगळवारी मध्यरात्री उसाला पाणी देण्यासाठी मोटार सुरू करत असताना विजेचा शॉक लागून एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. धनाजी दामोदर बागल (वय २८) असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.
ही दुर्घटना मंगळवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, धनाजी यांनी रात्री जेवणानंतर शेतात जाऊन मोटार सुरू करण्याचा प्रयत्न केला. मोटार सुरू करत असतानाच विजेचा जोरदार शॉक लागून ते जमिनीवर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
नुकतेच झाले होते लग्न
धनाजी बागल यांचे अवघ्या दहा महिन्यांपूर्वीच विवाह झाले होते. त्यांच्या पश्चात वृद्ध वडील, पत्नी, भाऊ आणि तीन बहिणी असा परिवार आहे. या अचानक झालेल्या अपघातामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
अकस्मात मृत्यूची नोंद
या घटनेची माहिती सांगोला ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली असून, सांगोला पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
