
Solapur district Inter-caste marriage
इन पब्लिक न्यूज विशेष लेख :
तरुणांना समाज ‘विवाह नावाच्या बलिवेदीवर’ चढवतो
भारतीय संस्कृतीत विवाह हा केवळ दोन व्यक्तींमधील नातं नसून दोन कुटुंबांचा, मूल्यांचा, परंपरांचा संगम मानला जातो. पण आजच्या बदलत्या सामाजिक वास्तवात एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो. विवाह हे प्रेम, बांधिलकी आणि समर्पणाचं प्रतीक आहे की व्यवहार आणि सौदाशिस्तीचं एक साधन?
जसे निराशावादी म्हणतात, “चिंता ही अटळ आहे,” तसेच काहीजण विवाहाकडे पाहतात — लग्न केले तरी चिंता आणि नाही केलं तरी चिंता! काही जण म्हणतात, “लग्न केलं तर बायकोची काळजी घ्यावी लागेल, नाही केलं तर स्वतःचीच काळजी करावी लागते,” म्हणजेच काळजीमुक्त कोणीच नाही.
स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा दाखला देत लेखक भगवंत कोळी विचार मांडतात की, काही तरुणांना समाज ‘विवाह नावाच्या बलिवेदीवर’ चढवतो आणि त्यामुळे ते त्यांच्या खऱ्या क्षमतेनुसार कार्य करत नाहीत. म्हणजेच विवाह हा त्यांच्या प्रगतीचा अडथळा ठरतो का?
विवाह म्हणजे प्रेम की व्यवहार?
व्यवहार म्हणजे देणंघेणं. विवाहातही तेच घडतं का? मुलगा सरकारी नोकरीत असेल तर हुंडा मागण्याची सुरुवात होते. दागिने, गाडी, मोबाईल, बस्त्यातून अगदी अंडरवेअरपर्यंत मागणी केली जाते. हे पाहता प्रश्न उभा राहतो. ही जोडपी लग्नासाठी एकत्र येतात की सौद्याच्या आधारावर ठरवली जातात?
हुंडा मागणं कायद्याने गुन्हा असला तरी हुंडा मागणारे अनेकदा ‘श्रीमंत’ असतात पण मनाने गरीब. एवढंच नव्हे तर हुंडा देऊन नातं जोडणं हे एका पवित्र नात्याला ‘व्यवहार’ बनवते.
विवाहाचा हेतू हरवतोय का?
आज विवाह हे फक्त सामाजिक बंधन न राहता, अनेकदा एक सौदा वाटतो – एका स्त्रीचा आणि तिच्या कुटुंबाचा. पैसे घेऊन संबंध ठेवणारी स्त्री ‘वेश्या’ म्हणवते, पण हुंडा घेऊन लग्न करणाऱ्या पुरुषाकडे समाज राक्षसी वृत्तीने पाहत नाही. हीच खरी शोकांतिका आहे.
उपाय काय?
लेखक म्हणतात, हुंडासाठी खर्च करण्याऐवजी जर तीच रक्कम मुलीच्या शिक्षणावर खर्च केली, तर त्या सक्षम होतील. आर्थिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या. अशा सक्षम मुली कधीच हुंड्याच्या आगीत जळणार नाहीत.
विवाह हा प्रेम, विश्वास आणि सहजीवनाचा संगम असावा. तो बाजारबुजारी व्यवहार होऊ नये. लग्नाचं खरं सौंदर्य मनाने आणि मूल्यांमुळे फुलावं, पैशांच्या ओझ्याखाली मरण पावू नये.
लेखन : भगवंत कोळी