पहलगाम हल्ल्याचा परिणाम: बाजारपेठा ओस पडल्या, पर्यटन ठप्प – व्यावसायिकांमध्ये चिंता

पहलगाम/प्रतिनिधी: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण पर्यटन क्षेत्रावर तीव्र परिणाम झाला आहे. हल्ल्यानंतर तिसऱ्या दिवशीही परिसरात तणावपूर्ण शांतता जाणवत असून, बैसरणसारख्या लोकप्रिय पर्यटनस्थळांवर शुकशुकाट पसरला आहे. हॉटेल्स, बाजारपेठा, टूरिस्ट पॉईंट्स पूर्णतः ओस पडले असून स्थानिक व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.
“पोट कसे भरायचं? ” – हॉटेल व्यावसायिक आणि कामगार हतबल
हल्ल्यानंतर जवळपास सर्व पर्यटकांनी आपली हॉटेल्स सोडून दिल्यामुळे पर्यटन क्षेत्रात मोठा धक्का बसला आहे. ” हल्लेखोरांनी आमचं आयुष्य हिरावून घेतलं. पर्यटक आमच्यासाठी देव आहेत. आता आमचं हातावरचं पोट कसं चालवायचं? “, असा भावनिक प्रश्न हॉटेलमध्ये काम करणारे अदिल खान यांनी उपस्थित केला.
मे महिन्यात बुकिंग पूर्ण भरलेली असतानाही, आता पर्यटक येतील की नाही, याची मोठी शंका निर्माण झाली आहे.
बाजारपेठा सुनसान – व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट
पहलगाम आणि परिसरातील ड्रायफ्रूट, केशर, हँडीक्राफ्ट अशा व्यवसायांना पर्यटकांवरच अवलंबून राहावे लागते. पर्यटकांच्या अनुपस्थितीत बाजारपेठा पूर्णपणे ओस पडल्या आहेत. ग्राहकच नसल्यामुळे मालाची विक्री ठप्प असून, याचा फटका थेट उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला आहे.
ड्रायव्हर आणि घोडेस्वार बेरोजगार – कर्ज फेडण्याचा प्रश्न
घोडेस्वारी आणि टॅक्सी ड्रायव्हिंग हे दोन्ही व्यवसाय पर्यटकांवर अवलंबून आहेत. अनेक युवकांनी कर्ज काढून गाड्या घेतल्या आहेत. हल्ल्यानंतर गाड्या रिकाम्या आणि घोडे चाऱ्याशिवाय उभे आहेत.
“कोरोनाच्या वेळी तरी मुदतवाढ मिळाली, आता कोण विचारतो?” असा उद्विग्न सवाल चालक सुहैल यांनी व्यक्त केला.
बैसरण परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था
‘पुढारी’च्या प्रतिनिधीने हल्ला झालेल्या बैसरण पर्यटनस्थळाला भेट दिली. हे ठिकाण मुख्य रस्त्यापासून ७ किमी आत जंगलात असून, केवळ घोडेस्वारी किंवा पायीच पोहोचता येते. सध्या सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून, हल्ल्याची चौकशी आणि शोधमोहीम सुरू आहे.
धोकादायक सिलिंडर हटवले, अनर्थ टळला
हल्ला झालेल्या भागात काही दुकानदारांनी गॅस सिलिंडर जंगलात फेकून दिल्याचे आढळले. सुरक्षा दलांनी हे सिलिंडर तत्काळ हटवले, अन्यथा गोळी लागून मोठा स्फोट होण्याची शक्यता होती, अशी माहिती स्थानिक पोलीस प्रशासनाने दिली