माहूर/प्रतिनिधी : महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतजमिनी पाण्याखाली गेल्या, पिके वाहून गेली तर काहींचा संसार अक्षरशः उघड्यावर पडला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने मुख्यमंत्री सहायता निधीत मदत करण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या माहूर येथील श्री रेणुका देवी संस्थान तर्फे तब्बल एक कोटी एक लक्ष रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आली आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी माहूर येथील सरकारी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
याचबरोबर जिल्ह्यातील महसूल व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनीही सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण ठेवले आहे. सप्टेंबर महिन्यातील एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असून जवळपास अडीच कोटी रुपयांची मदत या माध्यमातून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत इतर देवस्थान व सामाजिक संस्थांनाही पुढे येण्याचे आवाहन केले.
जिल्हाधिकारी म्हणाले :
माहूरच्या श्री रेणुका देवी संस्थानाने दाखवलेला मदतीचा आदर्श अनुकरणीय आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी जिल्ह्यातील सर्वांनी पुढे यावे.
धर्मस्थळ आणि प्रशासनाची हातमिळवणी झाल्यास आपत्ती काळात गरजूंपर्यंत आशेचा किरण पोहोचतो, याचे उत्तम उदाहरण माहूरच्या श्री रेणुका देवी संस्थानाने सादर केले आहे.
