
मुंबई / प्रतिनिधी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला बीकेसीतील सायकल ट्रॅक आता महायुती सरकारच्या निशाण्यावर आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) या ट्रॅकला हटवण्याच्या तयारीत असून, त्यासाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
बीकेसी परिसरात वाढलेल्या वाहतूक कोंडीचा मुकाबला करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे MMRDAने स्पष्ट केले आहे. ट्रॅक हटवून त्याठिकाणी नवीन मार्गिका तयार करण्यात येणार असून, त्यामुळे वाहतूक प्रवाह सुधारण्यास मदत होईल, असा दावा केला जात आहे.
आदित्य ठाकरे यांनी मंत्री असताना ९.९० किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक उभारण्यास पुढाकार घेतला होता. या प्रकल्पासाठी देखील कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. मात्र आता तोच ट्रॅक हटवण्यासाठी पुन्हा मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होणार आहे. कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी रचना बदल
सध्या सायन पूल बंद असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक बीकेसी मार्गे वळवली जात आहे. कलानगर जंक्शनपासून भारत डायमंड बोर्सपर्यंत रोजचा प्रवास त्रासदायक ठरतो आहे. दररोज सुमारे ६ लाख लोक बीकेसीत कामासाठी येत असल्यामुळे येथे कायमस्वरूपी वाहतूक कोंडी दिसून येते.
MMRDAच्या म्हणण्यानुसार, सायकल ट्रॅक हटवून नवी मार्गिका तयार केल्यास रस्त्याची क्षमता सुमारे ५० टक्क्यांनी वाढणार आहे. प्रत्येक मार्गिकेची वाहतूक क्षमता ६०० ते ९०० वाहनांनी वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रवासाचा कालावधी २५ मिनिटांवरून १५ मिनिटांपर्यंत कमी होईल, तसेच सिग्नलवरील प्रतीक्षा वेळ १० मिनिटांवरून ७ मिनिटांपर्यंत घटेल. त्यामुळे कार्बन उत्सर्जनातही ३० टक्क्यांची घट होईल, असा दावा करण्यात आला आहे.
राजकीय वादाला तोंड
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्टवर सरकारकडून असा हातोडा पडणं म्हणजे राजकीय सूडभावनेचा भाग असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाकडून केला जात आहे. या मुद्यावरून आगामी काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.