खळबळजनक! बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; “बीपी तपासून इंजेक्शन देऊ का?” विचारताच गोंधळ उडाला

सोलापूर / प्रतिनिधी: आरोग्य विभाग आणि पंचायत समितीच्या संयुक्त कारवाईत गोरडवाडी येथे एक बोगस डॉक्टर सापडला. बीपी तपासत “इंजेक्शन देऊ का?” असा प्रश्न विचारून औषध देणाऱ्या या बनावट डॉक्टरवर अखेर पोलिसांनी कारवाई केली आहे.
आरोग्य विभागाकडे मिळालेल्या निनावी तक्रारीच्या आधारे माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी येथे सुरू असलेल्या दवाखान्यावर छापा टाकण्यात आला. संबंधित डॉक्टरकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसल्याचे तपासात निष्पन्न झाले.
कशी झाली कारवाई?
पंचायत समितीच्या आरोग्य अधिकारी डॉ. प्रियांका शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. कर्मचारी शहाबाज शेख आणि चालक शहाजी चव्हाण यांना रुग्ण म्हणून दवाखान्यात पाठवण्यात आले.
डॉक्टरने बीपी तपासल्यानंतर “इंजेक्शन देऊ का? गोळ्या देऊ?” असे विचारत एका गोळीची विल्हेवाट लावली.
याबाबत माहिती मिळताच डॉ. शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल सतीश रोकडे यांनी त्वरित दवाखान्यात धाड टाकली. डॉक्टरकडे वैद्यकीय पदवी व नोंदणी बाबत विचारणा केली असता, त्याने स्वतःच कोणतीही डिग्री नसल्याची कबुली दिली.
तत्काळ कारवाई करत डॉ. शिंदे यांच्या तक्रारीवरून माळशिरस पोलिसांनी डॉक्टरवर गुन्हा दाखल केला आहे. दवाखान्यातील वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.