पंढरपूर / प्रतिनिधी: अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर वीरशैव लिंगायत समाजाचे संस्थापक, समतेचे नायक महात्मा बसवेश्वर यांची जयंती पंढरपूर शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध ठिकाणी तसेच पंढरपूर नगरपरिषद आणि मर्चंट बँक यांच्या पुढाकाराने महात्मा बसवेश्वरांना अभिवादन करण्यात आले.
अर्बन बँकेसमोर पार पडलेल्या मुख्य कार्यक्रमात वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष आणि मनमथ स्वामी मठाचे कार्यकारी अध्यक्ष युवराज डोंबे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात समता, न्याय आणि बंधुभावाचा संदेश देत वीरशैव समाजाची स्थापना केली. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये त्यांची जयंती दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी साजरी केली जाते.”
कार्यक्रमास महाराष्ट्र वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश भादुले, शहराध्यक्ष विशाल आर्वे, तालुकाध्यक्ष धनंजय मेनकुदळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी लिंगायत समाजातील विविध पोटजातींच्या कुंभार, तेली, कोष्टी, गवळी अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सन्मान करण्यात आला.
महिलावर्गही मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. ऋतुजाताई युवराज डोंबे, माधुरीताई अमित डोंबे, आरतीताई बसवंती यांच्यासह अनुराधा खोबरे, मनीषा ठिगळे, शुभांगी कटप, वंदना कोष्टी महिला उपस्थित होत्या.
महात्मा बसवेश्वरांचा जन्म कर्नाटकातील इंगळेश्वर बागेवाडी जि. विजापूर येथे इ.स. ११३१ मध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी झाला. कल्याणी चालुक्य राजवंशात जन्माला आलेल्या बसवेश्वरांनी राजेशाही जीवन नाकारून समाजहितासाठी आपले जीवन वाहिले. त्यांनी शूद्र आणि अतिशूद्रांना एकत्र करून सामाजिक समतेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरी होणारी जयंती पंढरपूरात मोठ्या श्रद्धा आणि थाटात पार पडली.
