ST प्रवाशांना मोठा झटका! तिकिट दरात वाढ
गेल्या तीन वर्षांपासून एसटी भाडेवाढ न करता सुरू होती

सांगोला /महेश लांगडे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (ST) प्रवाशांना मोठा झटका दिला आहे. एसटी बसच्या तिकिट दरात १४.९७ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन वर्षांपासून एसटी भाडेवाढ न करता सुरू होती, मात्र आता इंधन दरवाढ आणि अन्य कारणांमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
एसटी तिकीट महाग, रिक्षा-टॅक्सी दरातही वाढ
फक्त एसटीच नाही, तर रिक्षा आणि टॅक्सी प्रवासही महागणार आहे. १ फेब्रुवारीपासून नव्या दरानुसार रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे आकारले जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांवर अधिक आर्थिक ताण येणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्टीकरण
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून एसटी भाडेवाढ झाली नव्हती, त्यामुळे महामंडळाला तोटा सहन करावा लागत होता. अखेर राज्य सरकारने १४.९७ टक्के भाडेवाढ मंजूर केली असून ती तातडीने लागू करण्यात आली आहे.
एसटी प्रवाशांना मिळणाऱ्या सवलती कायम
- महिलांसाठी ५०% तिकिट सवलत सुरूच राहील.
- इतर सामाजिक गटांना दिलेल्या सवलती बंद होणार नाहीत.
- नवीन दरांसाठी परिपत्रक लवकरच जारी केले जाईल.
या वाढीमुळे प्रवाशांना अधिक खर्च करावा लागणार असला तरी सरकारने सवलती कायम ठेवल्या आहेत, त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.