जल्लोष नववर्षाचा, गुढीपाडव्याच्या उत्साहात महाराष्ट्र दंग; घराघरात गुढ्या उभारून सणाचा जल्लोष
ढोल-ताशांच्या गजरात नृत्य आणि पारंपरिक गीतांनी नववर्षाचे स्वागत .

रोहित हेगडे : महाराष्ट्रीय नववर्षाची सुरुवात करणारा गुढीपाडवा आज राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि रंगीत रांगोळ्यांनी घराघरात आणि रस्त्यांवर उत्साहाचे वातावरण दिसून आले.
गुढी उभारून शुभ पर्वाची सुरुवात
गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक घरासमोर शुभ चिन्ह म्हणून गुढी उभारली जाते. कडुलिंबाची पाने, फुलं, काठी, साखर आणि रंगीबेरंगी वस्त्राने सजवलेली गुढी उभारण्याची परंपरा शतकानुशतके सुरू आहे. यंदाही महाराष्ट्रातील प्रत्येक घरात गुढ्या उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशनानंतर पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर, ‘काय’ देणार जिल्ह्याला?
शोभायात्रांचे आयोजन, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राज्यभरात विविध संघटनांनी भव्य शोभायात्रांचे आयोजन केले. महिलांनी पारंपरिक नऊवारी साड्या नेसून, फेटे बांधून दुचाकी रॅलीत सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या गजरात नृत्य आणि पारंपरिक गीतांनी संपूर्ण वातावरण उत्साही झाले.
गोडधोडाचे खास पदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रम
गुढीपाडव्याच्या निमित्ताने घरोघरी श्रीखंड, पुरणपोळी, गुळपोळी यांसारखे पारंपरिक पदार्थ तयार करण्यात आले. तसेच मंदिरांमध्ये विशेष पूजांचे आयोजन करून नवीन वर्षाच्या मंगलमय सुरुवातीसाठी प्रार्थना करण्यात आली.
नव्या संकल्पांसह नववर्षाचे स्वागत गुढीपाडवा हा नवीन सुरुवातीचा दिवस मानला जातो, त्यामुळे नवीन उपक्रम, व्यवसाय आणि संकल्पांची सुरुवात याच दिवशी केली जाते. अनेक ठिकाणी नवीन वाहनांची, घरांची व व्यवसायांची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.