लिंबाच्या दरात विक्रमी वाढ, जाणून घ्या वाढत्या दरांमागचे कारण
सध्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथून देशभरात लिंबूचा पुरवठा केला जात आहे

उन्हाळ्याच्या कडाक्यामुळे लिंबाच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, त्याचा थेट परिणाम बाजारभावावर दिसून येत आहे. राज्यातील लिंबू हंगाम संपत आल्याने बाजारात पुरवठा घटला आहे, परिणामी लिंबाचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या किरकोळ बाजारात एका लिंबूसाठी तब्बल १० रुपये मोजावे लागत आहेत.
घाऊक आणि किरकोळ बाजारातील परिस्थिती
सध्या घाऊक बाजारात लिंबू ३ ते ५ रुपये प्रति नग दराने विक्री होत आहे. मात्र, पुरवठ्यातील घट आणि मागणीतील वाढ यामुळे किरकोळ बाजारात दर झपाट्याने वाढले आहेत. ग्राहकांकडून सरबत, हॉटेल तसेच घरगुती वापरासाठी लिंबाची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असल्याने मागणी कायम आहे.
महाराष्ट्रात लिंबू हंगाम शेवटच्या टप्प्यात
सध्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथून देशभरात लिंबूचा पुरवठा केला जात आहे. महाराष्ट्रातील हंगाम संपत आल्याने स्थानिक पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मुंबई बाजार समितीमार्फत वेगवेगळ्या राज्यांत आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून आलेल्या लिंबाचा पुरवठा केला जात आहे.
मराठी नवं वर्षात पावसाची हजेरी; IMD ने या जिल्ह्यांना दिला इशारा
शुक्रवारी मुंबई बाजार समितीत ९५ टन लिंबाची आवक झाली. मात्र, मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा असल्याने दर वाढले आहेत. महाराष्ट्र हा देशातील महत्त्वाचा लिंबू उत्पादक राज्य असून, अहमदनगर, सोलापूर आणि इतर काही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. सामान्यतः जून ते फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्रातील लिंबू देशभर पुरवला जातो, तर मार्च ते मे या काळात पुरवठा प्रामुख्याने आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि दक्षिण भारतातील इतर राज्यांतून होतो.
मुंबई बाजार समितीतील स्थिती
मुंबई बाजार समितीतून मुंबई, नवी मुंबई, ठाणे तसेच गुजरात, गोरखपूर, अमृतसर, जम्मू-काश्मीर, जयपूर आणि इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लिंबूचा पुरवठा केला जातो. बाजारातील उपलब्धतेनुसार दर ठरवले जातात, त्यामुळे पुरवठा कमी असल्यास दर वाढतात.
दरवाढीला ब्रेक लागणार?
यंदाच्या हंगामात २० एप्रिलपासून कर्नाटकातून लिंबूची मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत लिंबाच्या दरात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे मागणी सातत्याने वाढत राहिल्यास, दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.