हिंदीला विरोध, मग इंग्रजीला का नाही? – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

मुंबई / प्रतिनिधी : राज्य सरकारच्या इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीसोबत हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या निर्णयावर राज्यात टीकेची झोड उठली असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकाकारांवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
“इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हा कोणता विचार आहे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह काही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषिक धोरणावर आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, “महाराष्ट्रात मराठी ही अनिवार्य भाषा आहे आणि ती प्रत्येकाने शिकलीच पाहिजे. मात्र, इतर कोणतीही भाषा शिकण्याची मोकळीक लोकांना आहे. हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा आहे. मग इंग्रजी चालते, पण हिंदी नको हे कोणते तर्कशास्त्र?”
मराठीच्या स्थानाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, “मराठीला कोणीही विरोध केला, तर तो सहन केला जाणार नाही. पण मराठीसोबत इतर भाषांची शिक्षणात भर घातली, तर त्याचा विरोध का केला जातो?”