
सांगोला / प्रतिनिधी : सांगोला तालुका विधी सेवा समिती आणि विधिज्ञ सेवा संघ, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत कमलापूर येथे कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्दिष्ट समाजातील प्रत्येक घटकाला कायद्याचे मूलभूत ज्ञान मिळावे हे होते. शिबिरात महाराष्ट्र दिन १ मे, जागतिक कामगार दिन १ मे, आणि आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन २२ मे या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगोला न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश श्रीमती बी. एम. पोतदार मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला न्यायालयाचे दुसरे सह-दिवाणी न्यायाधीश एस. एस. साळुंखे, सांगोला विधीज्ञ संघाचे अध्यक्ष अॅड. एम. एन. ढाळे, सचिव अॅड. अजय तोरणे, सहसचिव अॅड. एस. व्ही. बोत्रे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. व्ही. बी. चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन अॅड. व्ही. एस. बेले यांनी केले.
प्रत्येक विषयावर तज्ज्ञांनी आपले विचार व्यक्त केले:
- अॅड. टी. एम. टकले यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि तिचे ऐतिहासिक महत्त्व उलगडले.
- अॅड. एस. के. बनसोडे यांनी कामगार दिनाचे महत्त्व स्पष्ट करत असंघटीत कामगारांसाठी असलेल्या कायद्यांची माहिती दिली.
- अॅड. ई. डी. कमले यांनी जैवविविधतेचे संवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीवर भर दिला.
अध्यक्षीय भाषणात श्रीमती बी. एम. पोतदार मॅडम यांनी महिला हक्क, कामगार कायदे व पर्यावरण रक्षणाबाबत समाजातील प्रत्येक व्यक्तीने सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरणही केले.
कार्यक्रमाला महिलांचाही भरघोस प्रतिसाद लाभला. शिबीर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कमलापूरचे सरपंच रावसाहेब अनुसे, उपसरपंच नितीन काळे, माजी सरपंच सौ. कलावती बंडगर, ग्रामसेवक व सदस्य यांचे मोलाचे योगदान लाभले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी न्यायालयातील कर्मचारी वाय.जी.तारे, पी. बी. शिंदे, संतोष शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अॅड. एम. एन. ढाळे यांनी केले.