सिंहगड महाविद्यालयामध्ये “नेक्स्ट जनरेशन फायरवॉल आणि क्लाऊड सुरक्षेबाबत” व्याख्यान उत्साहात संपन्न

पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात, दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी “नेक्स्ट जनरेशन फायरवॉल आणि क्लाऊड सुरक्षा” या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आधुनिक विषयावर तज्ञ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. व्याख्यानासाठी रेड प्रायव्हेट लिमिटेड या नामवंत कंपनीकडून श्री. नितीन कुलकर्णी हे तज्ञ उपस्थित होते. त्यांनी ML ( Machine Learning ) तंत्रज्ञानाचा वापर करून पुढील पिढीचे फायरवॉल कसे कार्यान्वित केले जातात, तसेच क्लाऊड सुरक्षेची आधुनिक तंत्रे कशी वापरली जातात, याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेमध्ये दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांनीही विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली. उद्योग जगतातील आधुनिक तंत्रज्ञान समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाल्यामुळे या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रा. मनोज कोळी, तसेच विभागातील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रमपूर्वक केले.