Karveer Niwasini aai Ambabai
कोल्हापूर/ प्रतिनिधी : आजच्या रथोत्सवाच्या दिवशी करवीर नगरीत विशेष धार्मिक व आध्यात्मिक उत्साह पाहायला मिळत आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई आज सिंहाच्या शार्दुलावर विराजमान होऊन नगरप्रदक्षिणेला निघाली आहे. हे रूपं म्हणजे शौर्य, सौंदर्य, आणि पराक्रमाचं प्रतीक आहे.

शार्दुल देवीचं रौद्र वाहन
शार्दुल म्हणजे सिंहाचा छावा. त्याच्यात अपार शक्ती असली तरी अनुभवाच्या अभावामुळे एक प्रकारचं धाडस, बेधडकता असते. असे असह्य व अनियंत्रित शक्तिसंपन्न प्राणीही आई अंबाबाईच्या अधीन असतात, हेच या रूपातून दर्शवलं जातं. त्यामुळे हे रूप धर्माचं रक्षण, अधर्माचा नाश, आणि समाजाच्या रक्षणासाठी सज्ज असलेलं मातृरूप असत.
सुमारे दीड फूट उंचीची उत्सव मूर्ती तांबे, पितळ आणि चांदी या तीन धातूंच्या मिश्रणातून तयार करण्यात आली आहे. या मूर्तीत अंबाबाई देवी उजव्या खालच्या हातात महाळुंग, डाव्या खालच्या हातात पानपात्र, उजव्या वरच्या हातात गदा, तर डाव्या वरच्या हातात ढाल अशा चार शस्त्रांनी सुसज्ज आहे.
ही मूर्ती नेहमी देवीच्या उजव्या बाजूला पूजली जाते आणि जेव्हा जेव्हा देवीला गाभाऱ्याबाहेर यावे लागते, तेव्हा याच उत्सव मूर्तीच्या माध्यमातून देवी सर्व विधी पार पडले जातात.
आजच्या दिवशी देवीच्या या रूपाचं शोभायात्रेतून नगरप्रदक्षिणा करताना दर्शन घेणे, हे भक्तांसाठी अतिशय पुण्यचं मानलं जातं.
श्री मातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तिकः!
