पिंपरी / प्रतिनिधी : वाल्हेकरवाडीतील कॉलनी परिसरात रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, १७ वर्षीय तरुणीवर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केला, आणि गंभीर जखमी झाल्यामुळे तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री ८.३० ते ९ वाजण्याच्या सुमारास घडली. तरुणी ही आपल्या आई व भावासोबत चिंचवड येथे राहत होती. तिच्या वडिलांना दारूचे व्यसन असल्याने गेल्या काही वर्षांपासून आईने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता.
या प्रकरणी तरुणीच्या मामाने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात दोघा दुचाकीस्वारांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीच्या मामाच्या मुलने फोन करून कळवले की, तरुणी वर दोन अनोळखी व्यक्तींनी चाकूने हल्ला केला असून, ती रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडली आहे.” तरुणीच्या मामाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व तरुणीला तातडीने खाजगी रुग्णालयात नेले. तेथून डॉक्टरांनी तिला वायसीएम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले. चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून, आरोपींची ओळख पटवण्याचे आणि हल्ल्याचे कारण समजून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तसेच स्थानिकांकडून माहिती संकलन पोलिसांन कडून करण्यात येत आहे.
