विशेष प्रतिनिधी : चारधामांपैकी एक असलेले पवित्र केदारनाथ धाम आजपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले असून, पहाटेपासूनच हजारो श्रद्धाळूंनी दर्शनासाठी गर्दी केली. भगवान शिवाच्या जयघोषात आणि मंत्रोच्चारांच्या गजरात सकाळी ७ वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये वसलेले हे मंदिर पुन्हा एकदा श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरले आहे.
पौराणिक कथा : पांडव, महाभारत आणि शिवसंवाद
महाभारत युद्धानंतर, पांडवांना कौरवांसह रक्त सांडल्याच्या पापाचं प्रायश्चित्त घ्यायचं होतं. तेव्हा त्यांनी भगवान शंकरांच्या शोधात हिमालयाची वाट धरली. परंतु पांडवांची भेट टाळण्यासाठी भगवान शिव यांनी म्हशीचं रूप घेतलं आणि केदारखिंडीत लपले.
भीमाने आपलं विराट रूप धारण करत पर्वतात पाय रोवले आणि सर्व प्राणी त्यामधून जात होते. म्हशीच्या रूपात असलेले शिवदेखील त्यातून जात असताना भीमाने त्यांना ओळखलं आणि त्यांच्या पाठीवर पकड घेतली. त्याच क्षणी भगवान शिव प्रकट झाले व पांडवांना दर्शन दिलं. म्हणूनच केदारनाथ मंदिरात शिवाची पूजा ‘पाठीच्या भागा’तून होते.
पशुपतिनाथशी असलेला संबंध
अशी मान्यता आहे की शिवाचे अन्य अवयव वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट झाले. नेपाळमधील प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिर त्याच परंपरेचा भाग असून, तेथे म्हशीच्या तोंडाच्या रूपात भगवान शिव पूजले जातात.
नर-नारायण अवतार आणि शिवभक्ती
शिवपुराणानुसार, भगवान विष्णूंचे नर-नारायण हे अवतार बद्रीनाथ परिसरात तपश्चर्या करत असताना, त्यांनी शिवलिंगाची स्थापना करून दररोज पूजन केले. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव तेथे प्रकट झाले आणि त्यांनी केदारभूमीत वास्तव्य पत्करले. म्हणून केदारनाथ धाम विष्णू-शिव भक्तीच्या समन्वयाचं प्रतीक मानलं जातं.
केदारनाथ : श्रद्धेची शिखरं गाठणारा अनुभव
हिवाळ्यात बर्फामुळे बंद असलेलं केदारनाथ मंदिर, उन्हाळ्याच्या आगमनाबरोबर पुन्हा उघडते. दरवर्षीप्रमाणे, यंदाही २ मे रोजी मंदिराचे दरवाजे उघडताच भाविकांनी ‘हर हर महादेव’च्या घोषात संपूर्ण परिसर गगनभेदी केला. केदारनाथ धाम फक्त मंदिर नाही, तर हजारो वर्षांची आध्यात्मिक आणि पौराणिक परंपरा जिवंत ठेवणारा एक दिव्य तीर्थक्षेत्र आहे. पांडव, विष्णू आणि शिव यांचा संगम असलेलं हे स्थळ भक्तांसाठी आत्मिक शांतीचं केंद्र आहे.
