संपादकीय
पत्रकार दिन विशेष : ६ जानेवारी १८३२
मराठी पत्रकारितेच्या इतिहासातला तो ऐतिहासिक दिवस. बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेलं दर्पण हे वृत्तपत्र म्हणजे मराठी पत्रकारितेचा पहिला हुंकार!
आज तब्बल पावणे दोनशे वर्षांनंतरही, हा दिवस ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा करताना एक प्रश्न पुन्हा उभा राहतो मराठी पत्रकारिता नेमकी कुठे चालली आहे?
स्वातंत्र्य चळवळीत जनजागृती करणारी, सामाजिक सुधारणांसाठी लढणारी पत्रकारिता…
आज 24×7 ब्रेकिंग, व्हायरल हेडलाईन, क्लिक्स आणि व्ह्यूजच्या रेसमध्ये अडकली आहे का?
पेन ते पिक्सेल… बदल अटळ, पण किंमत कोण देतोय?
खिळे जुळवून छापली जाणारी वृत्तपत्रं, रोटरी मशीन, त्यानंतर रंगीत प्रिंटिंग…
पुढे टीव्ही चॅनेल्स…
आणि आता मोबाईलवर झळकणारी बातमी!
पत्रकारिता बदलली, माध्यमं बदलली…
पण सत्य, निर्भयता आणि जबाबदारी टिकली आहे का?
“वाचण्यापेक्षा पाहणं सोपं!” टीव्हीसमोरचं आव्हान मोठं
लोकांच्या सवयी बदलतायत. “प्रिंट किंवा टीव्ही पूर्णपणे संपणार नाहीत,
पण लोक आता प्रस्थापित माध्यमांऐवजी ऑनलाइन कडे झुकत आहेत.”
मोबाईलचं स्क्रीन म्हणजेच आता मोबाईल टीव्ही!
वाचण्यापेक्षा पाहणं जास्त इंटरेस्टिंग हीच आजची मानसिकता.
डिजिटलचं भविष्य, पण फिल्ड कुठे हरवलं?
आज पत्रकारितेचं भविष्य डिजिटल असलं,
तरीही मोठा प्रश्न आहे फिल्ड रिपोर्टिंग कुठे गेलं?
राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या बातम्या, ग्रामीण वास्तव…
स्टुडिओ पत्रकारितेत गडप होतंय का?
दबाव, धमक्या आणि आर्थिक नाड्या!
“पत्रकारांवर अब्रूनुकसानीचे दावे,
जाहिराती बंद करण्याच्या धमक्या,
राजकीय दबाव हे रोजचंच वास्तव आहे.”
वेबपोर्टल्स वाढतायत,
पण रेव्हेन्यू मॉडेल कोसळलेलं!
पगार, सुट्ट्या, सुरक्षितता काहीच ठोस नाही.
पोटासाठी पत्रकारिता विकली जातेय का?
हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे.
भक्तीमय पत्रकारिता = लोकशाहीसाठी धोका?
“पत्रकारितेला पक्षीय अभिनिवेश जडला आहे.
लोकशाही, धर्मनिरपेक्षता यावरची ‘भक्तिमय’ मतं
हा येणाऱ्या काळातला सर्वात मोठा धोका आहे.”
भूमिका घ्यायची असेल,
तर त्यासाठी किंमत मोजायची तयारी हवी — हे वास्तव.
गाव-खेड्यात युट्यूब, शहरात ब्रेकिंग!
बातमीची स्पर्धा आता थेट गावापर्यंत पोहोचली आहे.
युट्यूब चॅनेल्स, स्थानिक डिजिटल मीडिया…
“24×7 स्पर्धेत टिकताना
पत्रकारांना अभ्यासासाठी वेळच उरत नाही.
स्वतःला अपडेट करणं हेच सर्वात मोठं आव्हान आहे.”
इन पब्लिक न्यूजचा थेट सवाल
आज पत्रकार दिन साजरा करताना फक्त शुभेच्छा पुरेशा नाहीत.
प्रश्न कठोर आहेत
- पत्रकार स्वतंत्र आहे की नियंत्रित?
- सत्यासाठी उभं राहण्याची हिम्मत उरली आहे का?
- डिजिटल वेगात मूल्यं गहाळ तर होत नाहीयेत ना?
मराठी पत्रकारितेचं भविष्य तंत्रज्ञानात नाही, तर निर्भयतेत आहे!
पत्रकार दिनाच्या सर्व निर्भय पत्रकारांना सलाम!
संपादन : ✍ “इन पब्लिक न्यूज – आवाज सर्वसामान्यांचा”
