सुरत : दिगंबर जैन संप्रदायातील शांतीसागर महाराज यांना 2017 मध्ये 19 वर्षीय श्राविकेवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवत सुरत सत्र न्यायालयाने 10 वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
या खळबळजनक प्रकरणात न्यायालयाने शुक्रवारी शांतीसागर महाराजांना दोषी ठरवले होते. आज शिक्षा सुनावण्यात आली असून, हा निर्णय जैन समुदायात आणि संपूर्ण समाजात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.
पीडितेने केला गंभीर आरोप : पूजेसाठी मागितला नग्न फोटो
पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, घटनेच्या काही दिवस आधी शांतीसागर महाराजांनी तिला व्हॉट्सअॅपवर कॉल करून पूजेसाठी तिचा नग्न फोटो मागितला होता. त्यांनी सांगितले की, “पूजाविधीसाठी असे फोटो आवश्यक असतात.” या मागणीनंतरच त्यांनी आश्रमात बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
2017 मधील घटना, विश्वासाला तडा
ही घटना 2017 मध्ये घडली होती. शांतीसागर महाराज त्या काळात सुरतमधील नानपूर येथील उपाश्रयात राहत होते. मध्य प्रदेशातून आलेल्या पीडितेच्या कुटुंबीयांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. पूजेसाठी आमंत्रण देत त्यांनी संपूर्ण कुटुंबाला आश्रयात थांबवले आणि रात्रीच्या वेळी, पूजेच्या निमित्ताने तरुणीला खोलीत बोलावून इतर कुटुंबीयांना बाहेर थांबायला सांगितले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली.
न्यायालयाने केली कठोर कारवाई
घटनेनंतर पीडितेच्या तक्रारीवरून लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि शांतीसागर महाराजांना अटक करण्यात आली. तेव्हापासून ते सुरतमधील लाजपोर कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. तपासानंतर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रावर सत्र न्यायालयात सातत्याने सुनावणी सुरू होती. या प्रकरणाने धार्मिक मुखवट्यामागील विकृतीचे रूप पुन्हा एकदा उघड केले आहे. श्रद्धेचा गैरवापर करत, श्रद्धाळू कुटुंबाच्या विश्वासाला तडा देणाऱ्या शांतीसागर महाराजांना अखेर न्यायालयाने गुन्हेगार ठरवले.
