
Jagadguru Sant Tukaram Maharaj
सोलापूर : जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यातील सराटी येथून आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. सोलापूर जिल्हा प्रशासन प्रमुख जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मोठ्या उत्साहाने व आनंदाने पालखीचे स्वागत केले व दर्शन घेतले. (Jagadguru Sant Tukaram Maharaj)

(Jagadguru Sant Tukaram Maharaj) चला पंढरीसी जावू, बाप रखुमा देविवरा पाहू, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी…असा हरी नामाचा गजर करीत सर्व वारकरी भक्ती रसात न्हाऊन निघाले. जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात वारकरी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे नेत्रदीपक असे गोल रिंगण झाले.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रकाश महानवर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले, उपविभागीय अधिकारी अमित माळी, श्रीमती विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजुल, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते.

हाती पताका, मुखात अखंड हरी नामाचा गजर आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन भक्तिमय वातावरणात आपल्या लाडक्या विठ्ठलाचे रूप पाहण्यास व त्याच्या पायाचे दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीच्या वाटेवर लगबगीने चालत आहेत. जणू हा भक्तीचा सागरच आहे.

नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सकाळी ८.३५ वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे आगमन झाले. यावेळी पालखी रथावर पुष्वृष्टी करण्यात आली तर पोलिस विभागाच्या बँड पथकानेही पालखीचे स्वागत केले. तसेच यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकाचे पूजन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पालखी स्वागतापूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप देण्यात आला. तसेच पुणे जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे पालखीची भक्तीभावाने देवाण-घेवाण करण्यात आली.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी रथाचे जिल्हाधिकारी यांनी केले सारथ्य-
पालखी स्वागतानंतर पालखीच्या स्वागत ठिकाणापासू पालखीच्या रथाचे सारथ्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम ही उपस्थित होते. पालखी स्वागत सोहळ्यापूर्वी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पालखी मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्ष, वैद्यकीय सेवा कक्ष तसेच आरोग्य केंद्रास भेट देऊन आरोग्य सेवेची माहिती घेतली. व वारकऱ्यांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात असे सांगितले.
नगरपरिषदेच्यावतीने पालखीचे स्वागत
अकलूज येथील गांधी चौकात अकलूज नगरपरिषदेच्यावतीने जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच जिल्हा प्रवेश ते सदाशिवराव माने विद्यालय या पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूने अकलूजकर नागरिकांनी पालखीचे स्वागत केले व दर्शन घेतले.
नेत्रदीपक रिंगण सोहळा
जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झाले. पताका, हांडे-तुळशी, विणेकरी, मृदंग व टाळकरी यांचे रिंगण झाले. तद्नंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र विश्वतेज यांनी सपत्नीक अश्व पूजन केले. त्यानंतर अश्व रिंगण झाले. अश्वाचे रिंगणी धावणे उपस्थित अकलूजकरांसाठी एक पर्वणीच होती. भक्तिमय वातावरणात पार पडलेला रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवता आला. येथे भाविक, वारकरी यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा नेत्रदीपक असा रिंगण सोहळा संपन्न झाला. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते.