श्री छत्रपती साखर कारखाना निवडणूक: इच्छुक उमेदवारांची धाकधूक शिगेला, सर्वपक्षीय पॅनेलची चर्चा रंगात

विशेष/प्रतिनिधी: श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची धाकधूक आता शिगेला पोहोचली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मुलाखतींनंतर कारखाना वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
या वेळी क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे हेही उपस्थित होते. पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पॅनेल तयार करण्याचा प्रयत्न सुरू असून, निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्नांना गती मिळाली आहे. याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सकारात्मक संकेत दिले आहेत.
मुलाखतीनंतर इच्छुकांमध्ये खळबळ
मुलाखती झाल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले असून, अंतिम पॅनेल जाहीर होण्यापूर्वी उमेदवारी मिळवण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. काही इच्छुकांनी “अभी नही तो कभी नही” अशी भूमिका घेतली असून, संधी मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
२१ जागांसाठी ४३१ अर्ज दाखल
या निवडणुकीत २१ संचालक पदांसाठी तब्बल ४३१ अर्ज दाखल झाले आहेत. किती अर्ज माघारी घेतले जातात आणि अंतिम पॅनेलमध्ये कोणाला स्थान मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सर्वपक्षीय पॅनेलची रंगतदार चर्चा
सर्वपक्षीय पॅनेलमध्ये कोणाची वर्णी लागणार, कोण बाजी मारणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे. इच्छुक उमेदवारांमध्ये तणावाचे वातावरण असून, उमेदवारी मिळवण्यासाठी संपर्क आणि लॉबिंग जोरात सुरू आहे.