सांगोला : सांगोला तालुक्यात गेल्या काही दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे . सोलापूर जिल्हयात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. सांगोला तालुक्यात अनअपेक्षितपणे ढगफुटी सारखा मोठा पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुल, बंधारे, घरे, डाळिंब बागा, द्राक्षे , भाजीपाला व शेती पिके यांचे खूप नुकसान झाले आहे.
प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहाणी करून पंचनामे करावेत. तातडीच्या ठिकाणी आपण त्वरीत मदत करीत आहोत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल तशा प्रकारच्या सुचना मुख्यमंत्री महोदयांच्या आहेत. शासकीय यंत्रणा व व्यवस्थेला पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या आहेत. पंचनामे करताना काही शेतात पाणी असल्याने त्याठिकाणी जाता येत नाही. तेथे पाणी कमी झाल्यानंतर पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाला पाठवण्याच्या सुचना प्रशासनाला केल्या आहेत. ओला दुष्काळ जाहीर करण्याची सर्वत्र मागणी होत आहे.
सांगोला तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी माझ्या सोबत – आम डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील , भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, आदी प्रमुख आहेत. तसेच प्रांताधिकारी बी. आर .माळी ,तहसीलदार संतोष कणसे व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित आहेत.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने ओल्या दुष्काळाची जनतेची मागणी आहे. या संदर्भात प्रशासनाशी आम्ही बोलतो. याबाबत शासनही गांभीर्याने विचार करित आहे. ओल्या दुष्काळाबाबत काही निकष असतात त्याचाही विचार करण्यात येत आहे. प्रचंड मोठा पाऊस झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती आहे.शासन व प्रशासन पातळीवर या संदर्भात निर्णय घेतला जाईल.
सांगोला तालुक्यातील महूद -अकलूज रोडवरील कासळगंगा ओड्यावरील पुलाचे काम चालू आहे. याठिकाणी पर्यायी पुल, रस्ता, रविवारी रात्री अतिवृष्टीमुळे वाहून गेला. त्यामुळे महुद -अकलूज रोडवरील वाहतूक बंद झाली आहे. याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री नाम. जयकुमार गोरे यांनी भेट दिली.
तसेच तालुक्यातील महिम येथील ओड्यावरील पाण्यामध्ये वाहून गेलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना भेट देऊन सांत्वन केले. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपये वैयक्तिक मदत व शासनाकडून दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी चार लाखापर्यंतची मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
तसेच कडलास येथील अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी शिरलेल्या नुकसानग्रस्त कुटुंबांना भेटी देऊन माहिती घेतली व मदत देण्याविषयी आश्वासन देत नुकसानग्रस्त कुटुंबांना आधार दिला. यावेळी शेतातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांनाही नुकसान देण्याविषयी व पंचनामे करण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना केल्या आहेत.
