इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट संपन्न
औद्योगिक भेटीत एकूण ५० विद्यार्थी आणि ०२ प्राध्यापकांनी सहभाग घेतला

पंढरपूर/राहुल कोळेकर : एस.के.एन.सिंहगड पंढरपूर अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन विभागातील तृतीय वर्षाच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी दिनांक २८ फेब्रुवारी व १ मार्च या दरम्यान एक्ससेलर व टी वर्क्स , हैदराबाद या दोन कंपनीमध्ये औद्योगिक भेट दिली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. सदर औद्योगिक भेटीत एकूण ५० विद्यार्थी आणि ०२ प्राध्यापकांनी सहभाग घेतला. या भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक प्रक्रियांशी परिचित करून देणे आणि त्यांच्या सैद्धांतिक ज्ञानाची जोड व्यावहारिक अनुभवासोबत लावणे हा होता.
सदरील भेटीमध्ये विद्यार्थ्यांनी एक्ससेलर या कंपनी मधील विविध विभागांची पाहणी केली आणि तेथील तज्ञ व्यक्तींशी संवाद साधला. कंपनीमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्र आयोजित केले होते, कंपनीतील तज्ञांनी उद्योगातील सध्याच्या ट्रेंड्स, आव्हाने आणि करिअर संधी याबद्दल महत्वाचे मार्गदर्शन केले. यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगाच्या गरजा, कौशल्यांची मागणी आणि भविष्यातील संधी यांचा स्पष्ट अंदाज मिळाला. विद्यार्थ्यांनी टी वर्क्स कंपनी मधील पी सी बी उत्पादन यंत्रणा, पी सी बी प्रोटोटाईप ,गुणवत्ता नियंत्रण, संशोधन आणि विकास, विक्री व्यवस्थापन यांचा प्रत्यक्ष अभ्यास केला.
ही शैक्षणिक भेट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन विभागाचे विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. तसेच विभागातील प्रा.वैभव गोडसे, प्रा.सोनाली गोडसे तसेच इतर प्राध्यापकांनी या दौ-याच्या नियोजनात मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांनी सदर औदयोगिक भेटीचा अनुभव अत्यंत प्रेरणादायी ठरल्याचे सांगितले व भविष्यात अशा अनेक औद्योगिक भेटींची अपेक्षा व्यक्त केली.