
Pandharpur Sinhagad Engineering College
पंढरपूर/हेमा हिरासकर : संगणक शास्त्र आणि अभियांत्रिकी विभागातील द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो, हैदराबाद येथे शैक्षणिक अभ्यास दौ-याचे आयोजन करण्यात आले. एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी पंढरपूर येथील एकूण 87 विद्यार्थी आणि 5 प्राध्यापकांनी या शैक्षणिक भेटीत सहभाग घेतला.
ही भेट विद्यार्थ्यांना इस्रोच्या अत्याधुनिक संशोधन, उपग्रह प्रणाली आणि अंतराळ तंत्रज्ञानाबद्दल प्रत्यक्ष माहिती मिळवण्याची संधी उपलब्ध करून देणारी ठरली. या दौ-याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन, उपग्रह तंत्रज्ञान, संचार प्रणाली आणि रिमोट सेंसिंग टेक्नॉलॉजीबद्दल सखोल माहिती मिळवून देणे हा होता.
सदरील भेटीमध्ये विद्यार्थ्यांना इस्रोमध्ये अवकाश प्रकल्पांसाठी आवश्यक असणारी माहिती, संकलन प्रक्रिया विविध प्रकारचे अंतराळ प्रकल्प कसे आखले जातात, त्यासाठी आवश्यक डेटा कसा गोळा केला जातो आणि त्या माहितीचे विश्लेषण कसे केले जाते याबद्दल मार्गदर्शन मिळाले. तसेच अवकाश संशोधन क्षेत्रातील सॉफ्टवेअर विकासाच्या विविध टप्प्यांबद्दल माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना इस्रोमध्ये वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक सॉफ्टवेअर साधनांचे थेट प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. इस्रोच्या उपग्रह संप्रेषण आणि रिमोट सेंसिंग तंत्रज्ञानाबददल (NRSC आणि MCF) या विभागांमध्ये वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळाली. अवकाश संशोधन क्षेत्रात होत असलेल्या नवीनतम संशोधनावर तसेच भारताच्या आगामी अंतराळ मोहिमांवर सखोल चर्चा झाली. उद्योग जगतामध्ये आणि संशोधन संस्थांमध्ये आवश्यक असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर समजावून घेता आला. नवीन संशोधन संधी आणि भविष्यातील प्रकल्पांबाबत थेट मार्गदर्शन मिळाले.
ही शैक्षणिक भेट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे सर व संगणक शास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. एस. व्ही. पिंगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. तसेच संगणक विभागातील प्राध्यापकांनी या दौ-याच्या नियोजनात मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांनी इस्रो भेटीचा अनुभव अत्यंत प्रेरणादायी ठरल्याचे सांगितले व भविष्यात अशा अधिक औद्योगिक भेटींची अपेक्षा व्यक्त केली.